अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो
दया धर्म शांतीच्या पथाचा, पथिक तुझा तूच हो
तू स्वयं दीप हो
अत्त-दीप-भव, स्वयंदीप हो
कोसळोत वर्षा, उठूदे झंजावात
आसूड विजेचे, घेऊनिया निमिषात
धावूदे दिशांना, करुनिया आकांत
पण निश्चल असुदे, ज्योत तुझ्या हातात
तू अविश्रांत सामर्थ्य उरी घे, सूर्याचे रूप हो
तू स्वयं दीप हो
अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो
मानव्य जपाया, हो तू मानव आधी
तेवता जळूदे,आसक्तीची व्याधी
बोधिसत्त्व फुलुदे, तुझिया ओठावरती
निथळू दे तयातून, सिद्धार्थाची नीती
तू कळ्या फुलातील कोमलता हो, सुगंध आनंद हो
तू स्वयं दीप हो
अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो
तू जळणारांचे, हो अवघे सर्वांग
हो हृदय तयांचे, सोड सुखाचा संग
जळताना दे तू, मंत्र जगा जळण्याचा
दु:खाच्या तिमिरा, सदैव संपविण्याचा
चैतन्य अहिंसा सत्य दयेचे, तूच मूर्त रूप हो
तू स्वयं दीप हो
अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो
—शांताराम नांदगावकर