Muknayak

वेदना व विद्रोहाचा प्रचंड विस्फोट अर्थात ‘मुकनायक’

माणसांसारखी माणसं असून शोषित,पिडीत,वंचित घटकांतील माणसांना माणसांसारखे जगता येत नव्हते,जाती धर्माच्या विळख्यात अडकून पिढ्यान् पिढ्या दारिद्र्यात खितपत पडलेल्या समाजाला सन्मानाचं जीवन जगता येत नव्हतं,मनाची घालमेल व मनातल्या वेदना कुणाजवळ व्यक्त करता येत नव्हत्या,खायला भाकरी न प्यायला पाणी मिळत नव्हतं,आतल्या आत व्याकूळ काळजाच्या वेदनेचा विद्रोह काळजालाच धडका द्यायचा,परंतु मुक्तपणे आपल्या वेदनेचा व विद्रोहाचा स्फोट होत नव्हता,अर्थात तोंडं असुन समाज मुका गुलाम होता,अशातच या वेदनेची जाणिव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महानायकाला झाली आणि या वेदनेच्या जाणीवेतून विद्रोहाचा स्फोट झाला हा वेदनेच्या विद्रोहाचा प्रचंड विस्फोट अर्थात ‘मुकनायक’ होता.
या महानायकानेच या मातीतल्या माणसांच्या वेदना जगासमोर मुकनायकाच्या माध्यामातून मुक्तपणे उघड केल्या,

याच मुकनायकाने मुक्याला वाचा दिली.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ३१ जानेवारी १९२० ला ‘ मुकनायक ‘ या वृत्तपत्राची निर्मीती केली.
कारण बाबासाहेबांना हे समजून चुकले होते की,

‘ज्या चळवळीला वृत्तपत्र नाही त्या चळवळीची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे असते ‘

बहिष्कृत लोकांत होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही

आणि म्हणूनच मुकनायकाच्या पहील्याच अंकात लिहीतांना बाबासाहेब लिहीतात,

“हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजला होय. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की,या मनोऱ्याला शिडी नाही आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा मार्ग नाही.ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे,खालच्या मजल्यातला माणूस कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची प्रथा नाही.”

एवढी निच प्रथा इथल्या व्यवस्थेने करून ठेवली होती,तीच निच प्रथा मोडीत काढायची असल्याने पहील्यांदा समाजात जागृती निर्माण करावी लागेल हे बाबासाहेब ओळखून होते.
म्हणुन मुकनायकाचा मुख्य उद्देश घेऊन शोषित,पिडीत व वंचित घटकांतील लोकांच्या व्यथा व त्यांचा आवाज जगापर्यंत पोहचवला पाहीजे व देशात घडणा-या इतर घडामोडी जनतेपर्यंत पोहचल्या पाहीजे. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी तत्कालिन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजनाही सुचवल्या होत्या.

स्पृश्यांचा उद्धार किंवा विकास होण्यासाठी अस्पृश्यांनी राजकिय सत्ता व शैक्षणिक ज्ञान मिळवणे किती गरजेचे आहे याचीही मांडणी याच मुकनायकातून करण्यात आली होती.

मूकनायक या वृत्तपत्राने

सामाजिक व धार्मिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही अस्पृश्यांनी बलवत्तर स्थान निर्माण केले पाहिजे ही जाणीव निर्माण केली पाहीजे असे सतत वाटत असे.म्हणुन बाबासाहेब आंबेडकरांनी “मनोगत” या नावानेच स्वलिखित अग्रलेख लिहून त्यात सदर उद्देशाची सविस्तर मांडणी केली होती.

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक नियतकालीकाच्या माध्यमातून समाजावरील अत्याचाराला वाचा फोडली,त्यात बहीष्कृत भारत,जनता,समता,प्रबुध्द भारत या वृत्तपत्राचा समावेश होता.

मुकनायक म्हणजे हिंदु धर्माने तेजोभंग केलेल्या मुक्या गलित गात्र झालेल्या बहीष्कृतांचा हुंकारच होता.

हे वृत्तपत्र रजि. क्रं. १४३० असा असून ३ स्टँन्ड हर्स्ट रोड गिरगाव मुंबई येथील का़शिनाथ रघुनाथसिंह यांच्या ‘मनोरंजन’ या छापखान्यात दर शनिवारी छापण्यात येत असे.

यावर्षी मुकनायकाला १०० वर्ष पुर्ण होत आहे,यानिमित्ताने बाबासाहेबांच्या पत्रकारीतेच्या दमदारपणाची प्रचिती येते.
मूकनायकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर बिरुदावली म्हणून संत तुकारामांच्या खालील
ओव्या छापल्या जायची.

काय करुन आता धरुनिया भीड|
नि:शक हे तोड वाजविले||१||
नव्हे जगी कोण मुकियाचा जाण|
सार्थक लाजोनी नव्हे हित||२||

जेव्हा इतर वृत्तपत्र आपापल्या जातीच्या हितासंदर्भात लिहायचे व इतर जातींबझ्दल अहीतकारक लिहायचे,हे जेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आले तेव्हा बाबासाहेबांनी तेव्हाच्या त्या वृत्तपत्रकारांना मुकनायकाच्या माध्यमातून एक इशाराच दिला होता,

कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चटका इतर जातीत बसल्याशिवाय राहणार नाही.समाज ही नौकाच आहे.ज्याप्रमाणे आगबोटीतून प्रवास करणाऱ्या उतारूने जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी किंवा मागाहून जलसमाधी ही घ्यावीच लागणार आहे.त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने,अप्रत्यक्ष नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार यात बिलकूल शंका नाही.म्हणूनच स्वहितसाधू वृत्तपत्रांनी इतरांचे नुकसान करुन आपले हित करावयाचे पढतमूर्खाचे लक्षण दाखवु नये

ख-याअर्थाने ‘मूकनायक’ हा बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा मानबिंदु होता.
‘मुकनायक’ हे वृत्तपत्र म्हणजे अन्यायाविरूध्दचा लढा होता,
त्यांची पत्रकारीता ही स्वतंत्र चिंतनाचा अध्याय होता,
‘आमची जखम’ या सदरातून अन्याला वाचा फोडणा-या अग्रलेखाचा प्रवासही थक्क करणारा होता,
या सर्व प्रवासात बाबासाहेबांची वेदनेतल्या विद्रोहाचे अनेक सदरे व्यवस्थेला घाम फोडणारीच होती,
मुकनायक हा चळवळीचा कणा होता तर सर्वसमान्य शोषित,पिडीत,वंचितांसाठी दिशादर्शक होता,
मुकनायकाने ख-या अर्थाने विचार विश्व निर्माण केलं होतं,
ज्या विश्वात आमची दु:खं अधिकृतरित्या मांडली जात होती,
मुकनायक शोषित,पिडीत,वंचितांना स्व – अस्तीत्वाची व भवितव्याची जाणिव करून देणारा होता,
भारतात जेव्हा अनेक समाज सुधारकांनी प्रबोधनातून समाज जागृततेची महुर्तमेढ रोवली अन् त्यानंतर भारतीय पीढी समाज सुधारणेच्या वाटेवर चालु लागली होती,अन् अशातच भारतीय वृत्तपत्राची सुरूवात झाली,असे असले तरी या वृत्तपत्रांमध्ये मक्तेदारी मात्र जात्यांध धर्माच्या ठेकेदारांचीच होती,अशा प्रतिकुल परिस्थितीत बाबासाहेबांनी मुकनायकाची उभारणी केली.यामुळे समाज प्रबोधनात भर पडली व परिवर्तनाची लाट सुरू झाली.
मुकनायक हे वृत्तपत्र सामाजिक बांधिलकी व जाणिव जपणारे होते,
एकीकडे इतर वृत्तपत्रे राजकिय क्षेत्रात जागृती करून स्वातंत्र्य चळवळीत योगदान देत होते तर त्याचवेळी बाबासाहेबांनी सामाजिक आशय जपला होता,
बाबासाहेबांनी महात्मा जोतीबा फुले,शिवराम जानबा कांबळे यांच्यासारख्या समाजसुधारकांच्या पाऊलावर पाऊल टाकत सामाजिक प्रश्नांना हात घातला होता,
वर्णभेद,वर्गभेद,धर्मभेद,लिंगभेद,
यामुळे वंचित असलेल्या समाजाला हक्क मिळवून देण्याचे काम या वृत्तपत्रानी केले,
बाबासाहेबांनी मुकनायकातून लिहीलेले लिखाण हे राष्ट्रहिताचे व समाजहिताचेच होते,
या लिखाणामुळे अनेक जाती धर्माचे लोक बाबासाहेबांच्या चळवळीसोबत जोडले गेले,बाबासाहेबांची मुकनायकातली वैचारीक मांडणी म्हणजे
अंधा-या काळोखात विचारांची धगधगती मशाल होती.
मुकनायक म्हणजे जाती नष्ट करण्यासाठी व जातीविहीन समाज निर्मीतीसाठी उपसलेलं प्रभावी हत्यार होतं,
मुकनायक म्हणजे बाबासाहेबांनी सामाजिक परिवर्तनाची पुकारलेली नांदी होती.

गंगाधर पानतावणे यांनी १९८७ साली जेव्हा भारतात पहिल्यांदा बाबासाहेबांच्या पत्रकारितेवर पी.एच.डी. साठी शोध प्रबंध लिहिला.त्यांनी त्यांच्या ग्रंथात म्हटले की,

“या मुकनायकाने बहिष्कृत भारतामधील लोकांना प्रबुद्ध भारताकडे नेले.

“बाबासाहेब महान पत्रकार होते.”

पहील्या अंकातील बाबासाहेबांनी लिहीलेला अग्रलेख म्हणजे ‘मनोगत’,,
दुस-या अंकात ‘स्वराज्याची सर सुराज्याला नाही’,
तिस-या अंकात ‘हे स्वराज्य नव्हे हे तर आमच्यावरती राज्य,’
असे एकामागुन एक अग्रलेख लिहून समाजाच्या व्यथा त्यांनीसरकारच्या निदर्शनास आणुन दिल्या,
मुकनायक हे वृत्तपत्र पैशाअभावी फार काळ चालले नाही,परंतु त्यातली विचारसरणी मात्र आजही आजच्या चळवळीला दिशादर्शकच ठरत आहे.

मुकनायक या वृत्तपत्राने अज्ञानी समाजाला एक नवी दृष्टी दिली आहे
जी सातत्याने गुलामांना गुलामीची जाणीव करू देणारीच ठरेल.

महानायकाच्या मुकनायकाने शताब्दी पुर्तीत पुन्हा आमुचा स्वाभिमान जागा केला.

अशा या महानायकाच्या मुकनायकाला तथा महान पत्रकारीतेला १०० वर्ष पुर्ण झाली,
त्यानिमित्ताने,
विश्व महानायकाच्या मुकनायकाला सन्मानाचा सलाम..

विकास साळवे,पुणे
+919822559924..✍