☸🇮🇳 *भारताचे संविधान* 📓📖✒
👉महोदय, माझे मित्र डाॅ.जयकर यांना कोणत्याही प्रकारे न दुखविता मी असे म्हणू इच्छितो की डाॅ.जयकरांनी या विषयावर निर्णय स्थगित करावा. या प्रस्तावाचे समर्थन करताना त्यांनी आपली बाजू कायद्याच्या आधारावर वैधानिक पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी जे तर्क प्रस्तुत केला त्याचा आधार तुम्हांला असे करावयाचा अधिकार आहे काय? असा होता. त्यांनी कॅबिनेट मिशनच्या प्रस्तावातील काही अंश वाचून दाखविला. हा भाग संविधान सभेच्या कार्यपद्धतीच्या प्रक्रियेशी संबंधित आहे आणि त्यांची अशी मान्यता होती की, या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी संविधानसभा जी कार्यपद्धत स्वीकारू इच्छितो ती कार्यपद्धती त्या प्रलेखात उल्लेखित कार्यपद्धतीच्या सरळ सरळ विसंगत आहे.
👉महोदय, मी हा मुद्दा वेगळ्या प्रकारे मांडू इच्छितो. मी ज्या प्रकारे हा मुद्दा मांडू इच्छितो तो असा, तुम्हांला हा प्रस्ताव सरळ सरळ पारित करावयाचा अधिकार आहे अथवा नाही याचा तुम्ही विचार करावा असे मी सुचवित नाही. कदाचित तुम्हांला तसे करण्याचा अधिकार असेलही. मला जो प्रश्न उपस्थित करावयाचा आहे तो असा, ‘काय? असे करणे सुज्ञपणाचे, दूरदर्शित्वाचे होईल? तुम्ही असे करणे सुज्ञपणाचे होईल काय? अधिकार असणे ही एक बाब आहे. सुज्ञपणा असणे ही सर्वस्वी वेगळी बाब आहे. या विषयाचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करावा अशी मी या सभागृहात विनंती करु इच्छितो. प्राप्त परिस्थितीत मुस्लीम लीगच्या सहभागाशिवाय प्रस्ताव पारित करणे सुज्ञपणाचे होईल काय? असे करणे मुत्सद्देगिरीचे होईल काय? असे करणे समजूतदारपणाचे होईल काय? याला माझे उत्तर असे आहे की, *प्राप्त परिस्थितीत सुज्ञपणाचे, समजूतदारपणाचे होणार नाही.’*
👉मला असे सुचवायचे आहे की, काँग्रेस आणि मुस्लीम लीग यांच्यातील विवाद सोडविण्याचा आणखी एक प्रयास होणे अगत्याचे आहे. हा प्रश्न इतका महत्वाचा आणि निकडीचा आहे की, हा प्रश्न एका पक्षाची प्रतिष्ठा किंवा दुसऱ्या पक्षाची प्रतिष्ठा या आधारावर सोडविला जाऊच शकत नाही, याची मला खात्री आहे. *राष्ट्राचे भवितव्य निर्धारीत करताना,* लोकांची प्रतिष्ठा, पक्षाची प्रतिष्ठा या बाबींना कोणतेही मूल्य नसते, *देशाच्या भवितव्याचा विचार हा सर्वतोपरी असावा.